जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरच्या पोलीस कोठडीत २३ ऑगस्टपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशकात १० ऑगस्ट रोजी सापळा रचून अटक केली होती.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याने टेंडरमधील मालमत्ता कोणाच्या सांगण्यावरून व कोणाकरिता खरेदी केली?. तसेच याकरिता आवश्यक असलेला पैसा कसा उपलब्ध केला?, यासह तब्बल १० महत्वपूर्ण कारणं आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस कोठडी मिळण्यासाठी १० ऑगस्टला न्यायालयासमोर ठेवली होती. परंतू कोठडीत असूनदेखील झंवरने पोलिसांना तपासात योग्य माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे कळतेय. अटकेत असलेल्या झंवरने नऊ दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांना सहकार्य केले नाही. पोलिसांनी झंवरच्या जळगाव येथील घर व कार्यालयातून जप्त केलेले कागदपत्र, शासकीय कार्यालयांचे शिक्के, आमदार, खासदारांचे लेटरपॅड आदी वस्तू त्याला दाखवून पडताळणी करून घेण्यात आल्याचे कळतेय. मात्र, अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास झंवरने टाळाटाळ केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, झंवरला नाशिक येथे नेत चौकशी करण्यात आली होती. परंतू त्याने पोलिसांना समाधानकारक माहिती दिली नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आज झंवरला न्यायालयात हजर केले असता २३ ऑगस्टपर्यंत त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या वृत्ताला तपासधिकारी सुचेता खोकले यांनी दुजोरा दिला आहे.