जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव छापेमारी करून साधारण दोन ट्रकभरून कागदपत्र गोळा करून नेले होते. अटकेतील पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारेसह इतर आरोपींचा पथके शोध घेत आहेत. दुसरीकडे एक पथक जप्त केलेल्या कागद पत्रांची छाननी करून महत्वपूर्ण पुरावे गोळा करत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपयुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘द क्लिअर न्यूज’ला दिली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचा अव्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. तर महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, विवेक ठाकरे आणि कंडारेचा वाहन चालक कमलाकर कोळी असे एकूण पाच संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. अटकेतील संशयितांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर सीए महावीर जैन यांनी जामीन अर्ज टाकला असून त्यावर १६ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
दरम्यान, घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यावर मागावर पोलीस मागील १५ दिवसापासून आहेत. दोघांसह इतर आरोपींच्या शोधार्थ राज्यभरात ३ पथके रवाना करण्यात आली आहेत. दुसरीकडे आपण ट्रकभर कागदपत्र जप्त केली आहेत. त्या कागदपत्रांचा अभ्यास सुरु असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. पुरावे गोळा करण्यावर आमचा भर असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपयुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘द क्लिअर न्यूज’ला दिली आहे.