जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित उद्योजक सुनील झंवर नेपाळमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे फरार आहेत. दरम्यान, कंडारे यांना आपण नगरजवळ सोडल्याचा जवाब वाहन चालकाने पोलिसांना दिला आहे. तर दुसरीकडे सुनील झंवर नाशिकमध्ये येण्याआधीच खबर लागल्यामुळे पोलिसांनी सापळा रचला होता. त्यामुळे झंवर गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झंवर नेपाळमध्ये गेला असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे संशयित आरोपी परदेशात पळून जाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता. त्यांच्याविरुद्ध ‘लुक आऊट नोटीस’ जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लुकआऊट नोटीस म्हणजे काय?
एखाद्या संशयित व्यक्तीला देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तपास यंत्रणांकडून विमानतळ इमिग्रेशन विभागाला लुकआऊट नोटीस पाठवली जाते. गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यक्ती देश,राज्य,शहर सोडून जाऊ नये म्हणून ही नोटीस पोलिस देतात शक्यतो विमानतळ परीसरात हिचा वापर जास्त प्रमाणात होतो. कारण विमान प्रवास करत कमी वेळात जास्त अंतर कापता येते, देशांतर करता येते. या नोटिसमध्ये व्यक्तीचे उपलब्ध डिटेल्स असतात. तसेच गुन्ह्याशी संबंधित माहिती असते. ह्या नोटीसीद्वारे व्यक्तीला प्रवास करण्याची मनाई करता येते आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देतात.