जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. पथक रात्री उशिरा पुण्यात पोहचणार असल्यामुळे झंवरला उद्या (बुधवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. दरम्यान, झंवरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळून कोणत्या गोष्टी जप्त करण्यात आल्या?. तसेच बनावट शिक्के, लेटर पॅड, डायरी यासह इतर महत्वपूर्ण माहिती उद्या समोर येण्याची शक्यता आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार सुनील झंवर हा बीएचआर घोटाळ्यातील मुख्यसूत्रधार आहे. झंवर गुन्हा दाखल झाल्यापासून अर्थात मागील ९ महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी देखील त्याच्या तपासासाठी राज्यभरात पथके रवाना केली होती. तर दुसरीकडे ‘बीएचआर’ची अधिकृत वेबसाईट असतांना बनावट सॉफ्टवेअर तसेच वेबसाईट तयार करून पतसंस्थेच्या मालमत्ता गुप्त कटातील साथीदार सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार करण्यात आला होता, असे पोलीस तपासात समोर आले होते. तसेच सुनील झंवरच्या घर झडतीमध्ये वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे अनेक बनावट शिक्के मिळून आले होते. तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील झंवरच्या रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात झाडाझडती घेतली होती. त्यावेळी पोलिसांना महापालिकेशी संबंधित वॉटर ग्रेस कंपनीच्या कागद पत्रांसह अनेक एटीएम कार्ड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे सुनील झंवरकडून पोलीस तपासात या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल. या चौकशीतून आणखी काही बड्या लोकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान,उद्या झंवरचे वकील न्यायालया समोर नेमकी काय बाजू मांडतात, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.
विजय वाघमारे (9284058683)