जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील बीएचआरच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात काही जण एका पेपरचे फोटो काढत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतू फोटोत दिसणारी व्यक्ती कर्जदार असून ती भेटायला आली होती, अशी माहिती अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी स्वत: दिल्यामुळे निर्माण झालेला संशयकल्लोळ मिटला आहे. दरम्यान, आता प्रवेशद्वारासह अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे चित्रीकरण होत असते.
या संदर्भात अधिक असे की, गुरुवारी दुपारी तीन व्यक्ती आले आणि त्यांनी कार्यालयातून फाईल घेत फोटो काढले. त्यानंतर ती फाईल गाडीत घेऊन गेले, अशा आशयाच्या मजकूरासोबत काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर जळगावात प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी दिल्यानंतर प्रकरण शांत झाले. दरम्यान, मागील काही महिन्यापासून बीएचआर घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. अनेक बड्या कर्जदारांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे पावत्या मॅचिंग करून कर्जफेड करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या कर्जदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचपद्धतीने अनेक थकीत कर्जदार देखील पोलिसांचा सिसेमिरा मागे लागायला नको म्हणून कर्ज भरण्यास तयार आहेत. याच अनुषंगाने अनेक कर्जदार माहिती घेण्यासाठी सध्या मुख्य कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. परंतू पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने बहुतांश कागदपत्र जप्त करून नेल्यामुळे अनेकांना माहिती मिळत नाहीय.
याच पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसीतील बीएचआरच्या मुख्यकार्यालयाच्या कार्यालयात गुरुवारी दुपारी एका गाडीतून तीन जण आले. त्यांनी काही कागदपत्रांचे फोटो काढले. तसेच त्या कागदपत्रांची एक फाईल सोबत घेऊन गेले, असा मजकूर असलेले काही फोटो जळगावच्या सोशल मीडियात व्हायरल होत होते. परंतू फोटोमध्ये दिसणारे व्यक्ती कर्जदार आहेत. तसेच कार्यालयाच्या आवारात असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती अवसायक चैतन्यकुमार नासरे यांनी दिली आहे. संबंधित फोटो बीएचआरच्या मुख्य गेटच्या बाहेर काढलेले आहेत. बीएचआरचा परिसर आता आतून तसेच बाहेरून २४ तास सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे.
तसेच अवसायकाच्या परवानगीशिवाय कोणीही बीएचआरची फाईल कार्यालयाच्या बाहेर नेऊ शकत नाही. कोणतीही फाईल आता फक्त न्यायालयाच्या कामासाठी बाहेर घेऊन जाता येऊ शकते. तसेच छायाचित्रातील व्यक्ती पुण्याचे कर्जदार महेंद्र पी. सभद्रा आणि त्यांची दोन मुलं आहेत. त्याची कर्जाची फाईल राज्य सीआयडीने २०१५ मध्ये आधीच जप्त केली आहे. त्यामुळे फाईल बाहेर नेली फोटो काढले, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. प्रवेशद्वारासह अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे चित्रीकरण होत असते. त्यामुळे कुणीही संशय करण्याचे कारणच नाही, असेही श्री. नासरे यांनी सांगितले.
विजय वाघमारे (9284058683)
















