जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील धाडसत्रात पोलिसांना मुख्य संशयित सुनील झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या १०० हून अधिक राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बनावट शिक्क्यांच्या संदर्भात स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिक्क्यांच्या मदतीने झंवरने कुठं अपहार किंवा गैरवापर केला आहे का?, याची लवकरच चौकशी सुरु होणार आहे. धक्कादायक म्हणजे जि.प.चे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी शालेय पोषण आहार योजनेत चौकशी केल्यानंतर पुरवठादार झंवरच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी उद्योजक सुनील झंवर यांच्या घरातून शासनाच्या वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे तब्बल बनावट शिक्के आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले होते. त्यानंतर या बोगस शिक्क्यांचे धागेदोरे थेट जिल्हा परिषदेपर्यंत येऊन पोहोचल्याची चर्चा सुरु झाली होती. बीएचआर घोटाळ्या प्रकरणी टाकलेल्या छाप्यात सुनील झंवरच्या कार्यालयात पिशवी भरून विविध शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिक्के आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. कारण या शिक्यांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार योजनेत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे छोटे शिक्के आणि स्वाक्षरी करून बिले काढल्याची चर्चा जिल्हा परिषदच्या वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांना शालेय पोषण आहार योजनेत बोगस बिले काढली जात असल्याचा संशय आला होता. त्यांनी चार तालुक्यांची सॅम्पल चौकशी केल्यानंतर त्यात पुरवठादार असलेल्या झंवर यांच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती. तर शालेय पोषण आहार प्रकरणात जानेवारी २०२० मध्ये आणखी एक घोळ समोर आला होता. पुरवठादाराकडून बाजारभावापेक्षा दुप्पटीने मसाले पदार्थ पुरवठा करत होता. विशेष म्हणजे पुरवठादाराकडून “गुणिना’ या मार्केटमध्ये नसलेल्या कंपनीच्या नावाने तयार केलेले मसाले पदार्थ पुरवठा करत असल्याचे समोर आले होते.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव छापेमारी करून साधारण दोन ट्रकभरून कागदपत्र गोळा करून नेले होते. अटकेतील पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारेसह इतर आरोपींचा पथके शोध घेत आहेत. दुसरीकडे एक पथक जप्त केलेल्या कागद पत्रांची छाननी करून महत्वपूर्ण पुरावे गोळा केले जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून कागद पत्रांची छाननीतून महत्वपूर्ण पुरावे गोळा केले जात आहेत. दरम्यान, लवकरच बनावट शिक्क्यांबाबत तपासात मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच बनावट शिक्के कुठं आणि कशा पद्धतीने वापरली गेली?. कोणत्या अधिकाऱ्यांची ती शिक्के होती, हे समोर आल्यास एक नवीन घोटाळा उघडकीस येऊ शकतो, असेही बोलले जात आहे.