कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. तसेच येथील बिर्ला चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चिमणराव पाटील हे होते.
येथील महादेव मंदिर परिसरात ते मेन रोडपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे व सुशोभिकरण करणे (२५ लाख), सेंट्रल बँकेजवळ प.पु. गोविंद महाराज भव्यदिव्य प्रवेशद्वारापाशी (२० लाख), कासोदा ते खडके रस्त्यासाठी डांबरीकरण करणे (२५ लाख), बांभोरी गावापासून मोरी बांधणे व डांबरीकरण करण्यासाठी (२५ लाख) जवळजवळ ९५ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर बिर्ला चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बोलतांना सांगितले की, दिड वर्षांनंतर आज अशी सभा आहे की मी एवढ्या लोकांमध्ये बोलतोय आणि ती सभा माझ्या आवडत्या गावाची आहे. जशी सूनबाई ही माहेरी येते त्याचप्रमाणे गुलाबराव पाटील आज त्याच्या माहेरला भाषण करण्यासाठी उभा आहे अतोनात प्रेम करणारे हे गाव ज्या गावाने मला शाळा अवस्थेपासून ते मंत्री अवस्थे पर्यंत बघितले आहे. तोच गुलाब तोच गुलाबराव आणि तोच गुलाब भाऊ ही सर्व नावे बदलण्यामध्ये एरंडोल तालुक्यात सर्वात मोठा वाटा कुठे असेल तर तो कासोदा परिसराचा आहे. सरकार कसे आले हे सर्व तुम्हाला माहीत आहे व या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला व त्यात तुमच्या गुलाबरावचा उत्तर महाराष्ट्रात दुसर्यांदा मंत्री म्हणून समावेश झाला. योगायोगाने जळगाव जिल्ह्यात पाण्याचेच खाते येत एकनाथ खडसे व गिरीष महाजन या दोघांकडे जलसंपदा खाते तर माझ्याकडे पाणीपुरवठा ते चारीने देतात मी पाईपने देतो. कासोद्याचा पाणी प्रश्न मला माहीत आहे आणि गेल्या काही वर्षापूर्वीच आपण सोळा गाव योजनेत आपण कासोदा गावाचा समावेश केला आता देखील कासोदा पाणी पाणी करतय त्या करीता आज अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आलोय त्यांना सांगितले की आठ दिवसांत कासोदा पाणी पुरवठा टेस्टिंग झाली पाहीजे नाहीतर तुमचीच टेस्टिंग करुन टाकेल. तुमच आणि आमच प्रेम आजच नसून ते १९८६ पासून शिवसेना निर्माण झाली तेव्हापासूनच आहे. शेवटी प्रेमाला मोल नसते आज या मतदारसंघात पालकमंत्री या पदाचा फायदा व्हावा याकरिता माझ्याकडून जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करेल. आम्ही या गावाच व परिसरात देणं लागतो हे लक्षात ठेवून आम्ही काम करण्याच प्रयत्न केलेला आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणी आल्याने त्यांनी त्या बोलून देखील दाखवल्यात. आजचा उत्साह पाहून जणू काही कासोदा व परिसरात दिवाळीच वातावरण आहे असे वाटत असल्याचे भाषणात म्हटले.
माझ्या मतदार संघात देखील एवढ्या जल्लोषात स्वागत झाले नाही ते इथे झाले त्याबद्दल आभार देखील मानले. कासोदा गावांबद्दल बोलतांना म्हटले हे गाव जेवढे वर उचलत तेवढ जमीनीवर पटकते देखील इथे प्रेम द्या व प्रेम घ्या प्रेम देणार गाव आहे व प्रेम देणार गाव आहे असे उदगार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला. जिल्हा नियोजन कडून जे विकास कामे होतील ते कामे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शेती संबंधी देखील चिंता व्यक्त करत जर या येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर कदाचित जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा लागेल असेही भाषणात म्हटले.
आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, कासोदा शहरात गेल्या दिड ते दोन वर्षापासून पाणी पुरवठा योजनेच काम सुरु आहे. याबाबत आढावा बैठक काही दिवसांपूर्वीच येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेतली असता या योजनेत बऱ्याच प्रमाणात तृटी आढळून आल्यात या पूर्ण न केल्यास आम्ही ही योजना ताब्यात घेणार नाही, असे देखील आम्ही अधिकाऱ्यांना खडसावून सांगितल्याचे आ. चिमणराव पाटील म्हटले. तसेच जोपर्यंत कोणत्याही पाणीपुरवठा योजनेला शाश्वत अशा प्रकारचा स्त्रोत मिळत नाही तो पर्यंत पाणी पुरवठा योजना चालणार नाही. जर अंजनी धरण भरले नाही तर कोट्यावधी रुपये खर्च करून सुध्दा कासोदे गावाला पाणी मिळणार नाही असे आवर्जून आ. चिमणराव पाटील हे म्हटले म्हणून अंजनी धरणावरून स्त्रोत बदलून गिरणावरुन पाणी लिफ्टिंग करावा लागेल तरच ही योजना उत्तमप्रकारे चालेल. पालकमंत्री व माझ्या संबंधांमध्ये गैरसमज होते मतभेद हे नातेसंबंधामधेच होतात परंतु आम्ही दोघे एकमेकांचे शत्रु नाहीत आणि कृपा करून आमच दोघांचे जमत नाही असा गैरसमज करुन नये असेही त्यांनी यावेळेस सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ. हर्षल माने व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, सरपंच महेश पांडे यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास गुलाबराव वाघ, रमेश महाजन एरंडोल, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, प्रमुख अतिथी रमेश जगन्नाथ महाजन, शांताबाई सखाराम रोकडे, किशोर निंबाळकर (माजी नगराध्यक्ष न.पा.एरंडोल), जगदिश पाटील (विधानसभा क्षेत्रप्रमुख एरंडोल), नानाभाऊ महाजन (सदस्य जि.प.जळगांव), ज्ञानेश्वर धोंडू आमले (मा.उपाध्यक्ष जि.प.जळगांव), राजेंद्र चौधरी (मा.नगराध्यक्ष न.पा.एरंडोल), मोहनभाऊ सोनवणे (मा.उपसभापती पं.स.एरंडोल) बबलु पाटील (तालुका प्रमुख युवासेना, एरंडोल), अनिल रामदास महाजन(मा.सभापती पं.स.एरंडोल), विवेक पाटील (उपसभापती पं.स.एरंडोल), दिलीप सखाराम रोकडे (मा.उपसभापती पं.स.एरंडोल), वैशाली मंगल गायकवाड (सदस्या जि.प.जळगाव), संजय तोताराम पाटील (उपतालुका प्रमुख,एरंडोल), गबाजी किसन पाटील (मा.सभापती पं.स.एरंडोल) यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सरपंच महेश पांडे यांनी केले तर आभार रविंद्र चौधरी यांनी केले. या कार्यक्रमात विविध संस्था व समाजातर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार करण्यात सर्व शिवसैनिक कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले.