गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातच्या नवीन मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र, गुजरातच्या सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रिपद गेलं आहे. त्यासोबतच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. याआधी शनिवारी अचानक गुजरातच्या राजकारणात भूकंप आला. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गुजरातमध्ये २०२२ मध्ये निवडणुका होणार आहेत आणि असं मानलं जात की भाजपला विजय रुपाणींवर दाव लावायचा नाही. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजप रविवारी (आज) विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकी भूपेंद्र सिंह पटेल यांच्यावर शिक्कामोर्तब झालं.
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. पटेल हे ५९ वर्षाचे आहेत. ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे. भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. १९९९-२०००मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१० ते २०१५ पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
२०१५-१७मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच २००८-१० मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.
















