भुसावळ (प्रतिनिधी) येथील प. क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी (Dilip Kumar Lalvani) यांना रेल्वेने (Railways) त्रासापोटी २५ हजार व तक्रार खर्चापोटी तीन हजार देण्याचे जिल्हा ग्राहक मंचाने आदेश दिले आहे. हा आदेश म्हणजे रेल्वे प्रवाशांना (train passengers) दिलेला योग्य न्याय असून रेल्वेला सूचक इशारा आहे.
प्रा. ललवाणी यांनी २२ मे २०१८ रोजी गुवाहाटी (आसाम) येथून भुसावळ येण्यासाठी गाडी. क्र.१५६४८ या रेल्वेचे आरक्षण केले होते. ही गाडी दुपारी तीन वाजता गुवाहाटी रेल्वे स्टेशनवरून निघणे निश्चित होते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशनवर आले. तीन वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांना भ्रमणध्वनीवर वा कोणतीही सूचना न मिळाल्यामुळे त्यांनी रेल्वे विभागात लेखी तक्रार केली. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले, की गाडी साडेसहा तास उशिराने निघेल. नंतरसुद्धा गाडी प्लॅटफॉर्मवर न आल्यामुळे त्यांच्या समवेतचे सहप्रवासी नितीन छेडा हे तक्रार करायला गेले असता त्यांनी गाडी पुन्हा तीन तास उशिरा येईल असे नमूद केले. त्यामुळे तीन वाजता सुटणारी गाडी ही रात्री जवळपास पावणे बारा वाजता गुवाहाटी स्थानकावरून रवाना झाली. यामुळे त्यांना व त्यांच्या परिवाराला व सोबत असलेल्या सर्व सहप्रवाशांना मानसिक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
भुसावळ आल्यावर लेखी तक्रार
भुसावळ येथे परतल्यानंतर त्यांनी रीतसर पुन्हा लेखी तक्रार केली. त्याला उत्तर न आल्यामुळे त्यांनी वकिलामार्फत गुवाहाटी रेल्वेला नोटीस पाठवली. ती रजिस्टर पोस्टाने पाठवली मात्र रेल्वेने त्याचीसुद्धा दखल न घेतल्यामुळे नाइलाजाने न्याय मिळावा या हेतूने त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (जळगाव) ८ एप्रिल २०१९ रोजी ग्राहक तक्रार क्रमांक १३९/२०१९ नुसार तक्रार दाखल केली. उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून ग्राहक आयोग यांनी तक्रारकर्ता प्रा. ललवाणी यांचे म्हणणे अंशता: मान्य करून प्रा. ललवाणी यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल पंचवीस हजार व तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रुपये तीन हजार रूपये अदा करावेत, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी दिले. हा आदेश म्हणजे रेल्वे प्रवाशांना दिलेला योग्य न्याय असून रेल्वेला सूचक इशारा आहे. याकामी भुसावळ येथील अॅड. धिरेंद्र आर. पाल यांनी तक्रारदारातर्फे प्रभावी बाजू मांडली.