भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील नॉर्थ कॉलनी परिसरात सोमवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका तरुणाला गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि स्कार्पिओ कारसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित मनोहर पवार (वय २६ रा. नॉर्थ कॉलनी भुसावळ), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. भुसावळ शहरातील नार्थ कॉलनी परिसरात संशयित आरोपी सुमित पवार हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सोमवारी 9 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई केली. त्यावेळी संशयित आरोपी सुमित पवार हा त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार (एमएच १९ सीवाय ३९७८) यामध्ये गावठी पिस्तूलसोबत एक जिवंत काडतूस घेऊन फिरत असताना दिसला. त्याच्याकडून ६ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण, संघपाल तायडे, प्रवीण भालेराव, सचिन पोळ आदींनी केली आहे.