जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी मोटार सायकल चोरीच्या घटनांची उकल करून आरोपींची अटक करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी पोलीस निरीक्षक संदिप पाटील, गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्याचे निर्देश दिले होते.
पोलीस निरीक्षक प्रदीप चौधरी यांना गुप्त बातम्यादारांकडून माहिती मिळाली की, एक इसम एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत आहे. त्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नायक प्रदीप चौधरी, पोलीस नायक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते, पोलीस कोंस्टेबल राहुल घेटे आणि पोलीस नायक योगेश बारी यांना आरोपीला पकडण्यासाठी सूचना दिल्या.
सदर पथकाने आरोपीला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले. आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपले नाव विक्की नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघ नगर, जळगांव) असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, त्याने बहिणाबाई उत्सव चालू असताना सागर पार्क येथून मोटारसायकल चोरी केली होती.
आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले व पोलिस कस्टडी मिळवून त्याची सखोल चौकशी केली. चौकशीत आरोपीने जळगाव शहरातील जिल्हा पेठ, रामानंद नगर, एम.आय.डी.सी. तसेच मोहाडी, धुळे जिल्ह्यातून एकूण १५ मोटारसायकली चोरी केल्याचे उघडकीस आणले. या चोरीतून आरोपीने अंदाजे ७,५०,०००/- रुपये किमतीच्या मोटारसायकली चोरल्या आहेत. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस स्टेशन, रामानंद नगर पोलीस स्टेशन आणि मोहाडी पोलीस स्टेशन, धुळे यांच्या हद्दीत ०९ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
सदर कारवाई हे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नायक प्रदीप चौधरी, पोलीस नायक विकास सातदिवे आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते हे करत आहेत.