नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. नवीन वर्षात मोदी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे, आज १ जानेवारी २०२२ ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान सन्मान योजनेचा १० हप्ता म्हणजेच २००० रुपये (Kisan Samman 10th Installment) जमा होणार आहे. देशातील एकूण १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मावळत असताना नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी नव्या वर्षातील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचं सांगितलं. यानुसार १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, “नववर्ष २०२२ चा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना समर्पित असेन. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसान योजनेचा १० वा हप्ता जारी करण्याची संधी मिळणार आहे. या अंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना फायदा होईल.”
पीएम किसान योजनेच्या अर्जाचं स्टेटस कसं तपासणार?
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलाय आणि तरीही तुम्हाला त्या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट दोन्हींच्या माध्यमातून मदत घेऊ शकता. वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in ला भेट द्या. या ठिकाणी होमपेजवर उजव्या कोपऱ्यात फार्मर्स कॉर्नर आहे. तेथे तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक माहिती टाकून तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळाले याचे तपशील मिळतील. फार्मर्स कॉर्नर येथे त्रुटी असलेली माहिती दुरुस्त करण्याचाही पर्याय असतो. याचा उपयोग करुन तुम्ही तुमचा आधार क्रमांक किंवा इतर काही तपशील अपडेट करु शकता. हेल्पालाईनद्वारे माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला 155261 किंवा टोल फ्री 1800115526 वर कॉल करता येईल. याशिवाय 011-23381052 वर कॉल करुनही माहिती मिळेल. pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवरही तक्रार करता येईल.