छत्तीसगड (वृत्तसंस्था) दंतेवाडाच्या अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी रस्त्यात पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.
आज दंतेवाडा येथील अरनपूर भागात नक्षलवादी लपल्याची बातमी मिळाली होती. या माहितीवरून दंतेवाडा येथील डीआरजी दल नक्षलविरोधी अभियानासाठी अरणपूरला गेले होते. शोध मोहिमेनंतर सर्व जवान परतत असताना माओवाद्यांनी आयडीचा स्फोट केला. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, हे खूप दुःखदायक आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रति मी शोक व्यक्त करतो. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आहे. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.