मुंबई (वृत्तसंस्था) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर (Property tax) माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Chief Minister Uddhav Thackeray) उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिली. तसेच हा क्रांतीकारी निर्णय असून राज्यातच नाही, तर देशातही असा निर्णय घेण्याचं धाडस कुणी केलं नसल्याचं नमूद केलं. ते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना जनतेला मोठं गिफ्ट दिले आहे, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले, नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे.
निर्णयाचा फायदा किती कुटुंबांना
५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. ज्यामध्ये २८ लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिवकले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी सांगितले.