मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या जामिनावर असलेला आर्यन खान (Aryan Khan) याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं क्लीन चिट दिली आहे. NCB ने आज, शुक्रवारी कोर्टामध्ये या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले. एनसीबीने कोर्टात दाखल केलेले हे दोषारोपपत्र ६ हजार पानांचे आहे. सबळ पुराव्यांअभावी सहा जणांविरोधात कोणतेही आरोप नाहीत. केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी आर्यनसह 20 जणांना अटक झाली होती. आता या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळाला आहे कारण त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 10 खंडाचे आरोपपत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये सबमिट करण्यात आलेलं आहे. 6000 पानांचे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जैसवाल,इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल जी आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा या सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.