जामनेर (प्रतिनिधी) पाचोरा ते जामनेर (पीजे) ब्रॉडगेज व बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ९५५ कोटी रुपये मंजूर केला आहे. तसेच जालना ते जळगाव या १७४ किमीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर मंजूर झाल्याची माहिती देखील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी जामनेर येथे दिली. जामनेर येथे रविवारी दुपारी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, जालना – जळगाव नवीन मार्गामुळे खान्देश हा दक्षिण भारताशी जोडला जाईल, असेही दानवे यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात राज्याला यावेळी सर्वाधिक ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच विमानतळांसारखी चकचकीच रेल्वे स्थानक करावयाची आहेत. खान्देशातून पुण्यासाठी नवीन गाडी सुरु करण्याची मागणी काही जणांनी केली. त्यावर दानवे म्हणाले की, पॅसेंजर चालविणे हे सर्वात तोट्याचे काम आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधना महाजन यांनी दानवे यांचे स्वागत केले. तर यावेळी खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकरे, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष साधना महाजन, माजी आमदार स्मिता वाघ आदी उपस्थित होते.