मुंबई (वृत्तसंस्था) अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरल्याचे वृत्त आहे. त्यानुसार उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. अगदी आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी देखील चर्चा आहे. साधारण 10 ते 12 मंत्री यावेळी शपथ घेतील, असे बोलले जात आहे. तर विधिमंडळ सचिवांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल 38 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतू आता राज्यात तूर्तास छोटेखानी विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. अगदी उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात साधारण 10 ते 12 मंत्री शपथ घेतील, असे कळतेय. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
विधिमंडळ सचिवांनी बोलावली तातडीची बैठक
विधिमंडळ सचिवांनी अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराची चाहूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाळी अधिवेशनाबद्दल खलबतं होऊ शकतात. तसंच दीर्घकाळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या नियोजनाविषयीची चर्चा होऊ शकते.