नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोव्हीशील्ड (Covishield) लस लवकरच मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार आहेत. या लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या विशेष समितीने केली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसींच्या नियमित विक्री करण्यासाठी मान्यता देण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या या लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसी रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देता येतील. सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना लस विक्रीची मुभा असणार आहे.
कोरोना लसींच्या नियमित मार्केटिंगसाठी मान्यता मिळवण्याच्या हेतूने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी देशाच्या औषध महानियंत्रकांकडे (DCGI) अर्ज केले होते. त्यांच्या अर्जाची दखल घेताना तज्ज्ञांच्या विशेष समितीने लसींच्या चाचणीसंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर खुल्या बाजारातील लसींच्या विक्रीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला आहे. समितीने केलेल्या शिफारसीला अनुसरून आता सरकारकडून औपचारिक अंतिम मंजुरीची घोषणा केली जाण्याची प्रतीक्षा आहे.