मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्याच बहुमत सिद्ध करा, या आशयाचं पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल. बहुमत सिद्ध करण्याच्या उद्देशानं हे पत्र पाठवण्यत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकर आता विशेष अधिवेशन लावलं जाण्याची शक्यता आहे. 39 आमदारांनी पाठिंबा काढल्यानं सरकार अल्पमतात आल्याची माहिती राज्यपालांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार आता सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ?
राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, असा सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनीच गुवाहाटीमध्ये ही माहिती दिली. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.