औरंगाबाद (वृत्तसंस्था) सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीतून भास्कर पेरे पाटील यांनी माघार घेतली होती, तर त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मात्र पेरे पाटील यांच्या मुलीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
पाटोदा येथे भास्करराव पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे यांच्याही पराभव झाला. त्यांना निवडणुकीत १८६ मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुर्गेश खोकड यांनी २०४ मतं मिळवत निवडणूक जिंकली. मागील कित्येक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवलेली आहे. या काळात त्यांनी पोटादा गावाचा विकास करून गावाची किर्ती समस्त राज्यात पसरवली होती. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. मात्र, यावेळच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा समाना करावा लागला. भास्कर पेरे ३० वर्षांनंतर गावाच्या राजकारणातून बाद झाले आहेत.
पाटोद्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श सरपंच अशी ओळख असलेल्या भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झाल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, मी ही निवडणूक लढवत नसल्याने निवडणूक काळात मी गावात जाणार नाही, तसंच मुलीचा प्रचारही करणार नाही, अशी भूमिका पेरे पाटील यांनी बोलून दाखवली होती.