मुंबई (वृत्तसंस्था) मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. खडसे यांनी पुन्हा पक्षात येणाचं आवाहन, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. तावडे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विनोद तावडे यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखीतमध्ये यासंदर्भात भाष्य केले. तावडे म्हणाले की, पक्षात नाथाभाऊ सारख्या लीडरशीपची गरज आहेच. खडसे यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली जाण असून त्यांच्यासारखा नेता भाजपमध्ये असावा. ‘मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं.. पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत.’ असं म्हणत तावडेंनी एकनाथराव खडसेंनी भाजपमध्ये यावं पण त्यांनी शांत राहावं असंही म्हटलं आहे. परंतु, माझे एकनाथ खडसे किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही किंवा त्यांना प्रस्ताव दिलेला नाही, अशी पुस्तीही विनोद तावडे यांनी जोडली. दरम्यान, विनोद तावडे यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत काही तरी वेगळं राजकारण सुरुय का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.
पुन्हा भाजपात जाणार नाही : खडसे !
भाजपात परत येण्याच्या आवाहनावर खडसे यांनीही मत मांडले आहे. तसेच, आपण पुन्हा भाजपात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेय. तावडे आणि मी अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम करत होतो. अलीकडची परिस्थिती पाहिली तर त्यांना असे वाटते की, जुन्या लोकांनी एकत्र यावे, त्यामुळे निवडणुका जिंकण्यास मदत होऊ शकेल. परंतू मी कुठल्याही परिस्थितीत भाजपात जाणार नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे.