जळगाव (प्रतिनिधी) मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी फरारी असताना त्याने जळगावात मुक्काम केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गोसावीच्या अटकेबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जळगावचा उल्लेख केल्यामुळं या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. एवढेच नव्हे तर, गोसावी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे देखील माहिती समोर येत आहे.
पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पहाटेच्या सुमारास कात्रजमधील एका लॉजमधून किरण गोसावी याला अटक करण्यात आली. त्याने आत्मसमर्पण केले नसून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गोसावी कुठे आणि कसा कसा फिरला? याबाबत माहिती द्या असा प्रश्न विचारल्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपण क्रोनोलॉजी समजून घ्या असं म्हणत गोसावी बऱ्याच ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. यामध्ये लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पुणे पोलिसांच्या टीम गेल्या होत्या. हा पळत होता तेव्हा तो सचिन पाटील या नावाने सर्वत्र जात होता. सचिन पाटील या नावाने हॉटेलमध्ये राहत होता.
आपण स्टॉप क्राईम एन्जीओचा प्रतिनिधी असल्याचंही तो सांगत होता. ही प्राथमिक माहिती मिळाली आहे आम्ही याची खातरजमा आणि चौकशी करत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान गोसावी हा चाळीसगाव तालुक्यातील पिलखेड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर गोसावीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि अमळनेर येथे मुक्काम केल्याचे देखील कळते. दुसरीकडे गोसावी जर जळगाव जिल्ह्यात आला होता तर तो नेमका कोणाच्या संपर्कात होता? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुणे पोलिसांनी मात्र, चौकशीत याबाबत त्याच्याकडून माहिती मिळवणार असल्याचे सांगितले आहे.
















