जालना (वृत्तसंस्था) मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले आहे. परंतू यांनी सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. तर दुसरीकडे सकल मराठा समाजानं शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन उपोषण मागं घेतल्याबद्दल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद देतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अनेक वर्ष थांबलो आणखी काही दिवस देऊ असं सांगत समितीला वेळ वाढवून देऊ असं जरांगे यांनी म्हटलं आहे. तसंच याच समितीने वेळ घेऊन राज्यभर काम करावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. पण आता दिलेली मुदत अखेरची असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे त्यांना वाढवून देऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ वाढवून दिली आहे. यापुढे एकही दिवस वाढवून देणार नाही असंही जरांगे पाटील यांनी ठणकावलं आहे. सर्व मराठ्यांची दिवाळी गोड व्हावी करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
शिंदे समितीने दोन महिन्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरवात करावी. नात्यातील सर्व व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात यावीत. सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत आहे. पण, दिलेली ही वेळ शेवटची असेल. यापुढे सरकारला कसलाही वेळ दिला जाणार नाही. मी उंबऱ्याला शिवणार नाही अन् साखळी उपोषण थांबणार नाही. आज आरक्षण फक्त स्थगित होणार आहे, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
















