मुंबई (वृत्तसंस्था) नगराध्यक्ष व सरपंच हे थेट जनतेतून निवडले जावेत, अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याची पद्धत लवकरच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडणार जाणार याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. फडणवीस यांची भेट घेऊन आपण नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून निवडले जावेत, अशी मागणी केली. त्यावर त्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे ट्वीट मुनगंटीवार यांनी केले आहे. तसेच अडीच वर्षे नगराध्यक्ष वा सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही, अशी तरतूद केली जाण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे.
१८ ऑगस्टला ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट नगराध्यक्षांची निवडणूक होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतू नव्या सरकारला याबाबतचा निर्णय घ्यायचा असेल तर अध्यादेश काढून निवडणूक आयोगाला तशी विनंती करावी लागणार आहे. नगर परिषदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २० जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी थेट नगराध्यक्ष, थेट सरपंच निवडण्याची पद्धत पुन्हा आणली होती. याचा भाजप व शिवसेनेला मोठा फायदा झाला होता. मात्र, उद्धव ठाकरे नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येताच त्यांनी ती पद्धत बंद केली होती.