मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सीआरपीसी 160 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याच्याशीच निगडीत प्रकरणात फडणवीसांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या होम डिपार्टमेंटचा घोटाळा मी बाहेर काढला होता. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी आता सीबीआय करणार आहे, असे ते म्हणाले. यासंदर्भात कागदपत्र आणि पुरावे फडणवीसांनी केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. फडणवीसांनी तथाकथिक घोटाळा बाहेर काढल्यानंतर त्याच्याशी संबंधित फाईल्स आणि अन्य कागदपत्रे केंद्राच्या गृह सचिवांना दिले होते. यानंतर ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती उघडकीस आल्याने राज्य पोलिसांनी फडणवीसांविरोधात तक्रार दाखल केली. यावर पुणे पोलिसांनी फडणवीसांना प्रश्नावली पाठवली होती. याची उत्तरे न दिल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितल. मात्र, ते खोटं असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
मी काल मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी मला सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे. यानुसार मला उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं आहे. मी पोलिसांना सहकार्य करणार असून बीकेसी पोलिसांच्या प्रश्नावलीला उत्तरं देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
‘मी पोलिसांना सहकार्य करणार’
मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षी मार्च महिन्यात गृहखात्यातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत तसंच हे पुरावे देशाच्या गृहसचिवांना देतोय हेसुद्धा सांगितलं होतं. घोटाळ्याची जी माहिती माझ्याकडे होती ती त्याच दिवशी दिल्लीला गेल्यानंतर गृहसचिवांना दिली होती. त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने या संदर्भातील सगळी चौकशी ही सीबीआय़कडे सुपूर्द केली आहे.
या बदली घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत असून अनिल देशमुखांची चौकशी केली जात आहे. ते सध्या तुरुंगात आहेत. यातल्या महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. जेव्हा चौकशी सीबीआयकडे सोपवली तेव्हा राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरता एक एफआयआर दाखल केला. तसंच ऑफिशियल सिक्रेटमधील माहिती लीक कशी झाली, अशी तक्रार दाखल केली. यासंदर्भात मला पोलिसांकडून प्रश्नावली पाठवण्यात आली होती, असं फडणवीस म्हणाले.