नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिंदे सरकारने प्रभाग रचनेचा निर्णय बदलून तीन सदस्य ऐवजी चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. याविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते दिल्लीला दाखल झाले आहेत.
80 टक्के निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तीन सदस्यीय रचनाही अंतिम झाली आहे. तरी भाजपने आपल्या फायद्यासाठी आता चार सदस्यीय रचना तयार केली आहे. आगामी निवडणुकीसाठीची सगळं कामे झाली असताना हा निर्णय घेऊन उगाच वेळ घालवला जात आहे, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं आहे. सरकारच्या हा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीकडून न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे न्याय मागण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते दिल्लीला गेले आहे. आरखडा तयार करणं, त्यावर हरकती – सूचना मागवून सुनावणी घेणं आणि मतदारयाद्या प्रसिद्ध करणं ही कामं निवडणूक आयोगाकडून पूर्ण करण्यात आली असून आता फक्त निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं बाकी आहे. अशावेळी संपूर्ण आराखडा बदलण्याला आपला विरोध राहील असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं होतं. नव्याने प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करुन निवडणुका वेळेत पार पाडाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुण्यातील जेष्ठनेते अंकुश काकडे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, बाबुराव चांदेरे, महेंद्र पठारे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून बुधवारी ते याचिका दाखल करणार आहेत.