मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना चांगलेच भोवले आहे. सिंधुदुर्ग कोर्टाने (Sindhudurg court) नितेश राणे ( nitesh police custody) यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार नितेश राणे आज कणकवली दिवाणी न्यायालयात सरेंडर झाले आहेत. तर कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे. आमदार नितेश राणे आज दुपारी तीन वाजता कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सलीम शेख यांच्या न्यायालयात हजर होण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर ते न्यायालयात शरण आल्यावर न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला. यानंतर फिर्यादी पक्ष आणि राणे यांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली. न्यायालयाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती.
जाणून घ्या…संतोष परब हल्ला प्रकरण नेमकं काय आहे?
संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख होते. 18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. एका गाडीनं आपल्याला आधी धडक मारली, त्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोराने नीतेश राणेंना कळवायला पाहिजे, असा उल्लेख केल्याचं संतोष परब यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
याप्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह चार जणांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांचीही पोलीसांनी चौकशी केली. पण नितेश यांनी आपल्यावरचे आरोप साफ नाकारले तसंच अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्गातील जिल्हा न्यायालय, उच्च न्यायलय आणि सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण सर्वत्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
नितेश राणे यांच्या संगनमताने गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप
नितेश राणे हे गुन्हा घडला त्या ठिकाणी ना हजर होते, ना त्या भागात होते. शिवाय ज्या दिवशी हल्ला झाला त्या 18 डिसेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंत नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनला जाऊन पोलीसांच्या चौकशीला उत्तरेही दिली आहेत, असं राणेंच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी सचिन सातपुते याने नितेश राणे यांच्या संगनमताने या गुन्ह्याचा कट रचला आणि नितेश राणे यांनी फिर्यादीचा फोटो सातपुते यांना दिला. ती जागा सातपुते याने दाखवली आहे आणि आणि त्या जागेचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे.