मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसह ठाकरे गटाच्या आमदारांनाही विधानसभा अध्यक्ष राहुल दार्वेकर यांनी आज नोटीस पाठवली आहे. विधानसभा अध्यक्षांनी नोटीस जारी केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत लवकरच निर्णय होय्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाने या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर शिवसेनेच्या आमदारांना आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नोटीस दिल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरु होणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी (7 जुलै) सांगितलं होतं.
आमदार सुनील प्रभू यांनी ठाकरे गटाच्या वतीने या महिन्यात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा केला, याचिकेत करण्यात आला होता. तर राहुल नार्वेकर यांनी सुनावणी लवकरच घेणार असल्याचे म्हटल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नोटीस जारी केली असून दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही गटाचे आमदारांना बोलावून देखील विधानसभा अध्यक्ष चर्चा करणार असल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर लगेचच राहुल नार्वेकर या संदर्भातला निर्णय घेतील.