चाळीसगाव (प्रतिनिधी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Y B Chavan Centre) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपाचे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे. दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी शरद पवारांशी भेट घेतल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर सोशल मिडीयावर चांगलीच रंगली होती. खासदार पवार व आमदार चव्हाण हे योगायोगाने या सेंटरमध्ये आपापल्या कामानिमित्त गेले होते. त्यामुळे भेटीच्या चर्चेला चांगलेच उधाण आले होते. इंडो-आर्यन भाषेचा दर्जा मिळालेल्या आणि बंगळुरू येथील भारतीय भाषेची विज्ञान भवनसह युनोस्कोनेही दखल घेतलेल्या अहिराणी भाषेचे दुसरे विश्व संमेलन शनिवारपासून (ता. २२) तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने होत आहे. या संमेलनाचे आमदार चव्हाण स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचा उद्घाटन सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शनिवारी होणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
आमदार चव्हाणांची आणि शरद पवारांच्या भेटीची चर्चा
ऑनलाइन स्वरूपात होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून आमदार चव्हाण हे शुक्रवारी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी गेले होते. त्याचवेळी शरद पवारदेखील काही कामानिमित्त या ठिकाणी उपस्थित होते. आमदार चव्हाण हे भाजपचे आमदार असल्याने व वेगवेगळ्या स्टिंग ऑपरेशनचा त्यांना चांगला अनुभव असल्याने ते पवारांची ते भेट घेऊ शकतात, असा अंदाज मुंबईतील काही पत्रकारांनी लावला अन् त्यातूनच ही चर्चा पसरवल्याचे बोलले जात आहे.
भेट घेतली नसल्याचा आमदार चव्हाणांचा खुलासा
आमदार चव्हाण यशवंतराव चव्हाण सेंटरमधून बाहेर पडताच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठून आपण शरद पवारांची भेट घेतली का, अशी विचारणा केली. त्यावर आमदार चव्हाण यांनी, आपण संमेलनाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलो असून, पवार साहेबांची कुठलीही भेट घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आज केवळ दुर्मीळ योगायोग घडला असेल.
आजवर पवार साहेबांच्या सावलीत देखील मी उभा राहिलेलो नाही आणि येत्या काळातसुद्धा तशी गरज भासणार नाही. त्यामुळे कोणतीही गुप्त किंवा उघड बैठक घेतलेली नाही. शिवाय मी त्यांची भेट घेण्याएवढा मोठा नेतादेखील नाही. त्यासाठी आमचे वरिष्ठ नेते आहेत. अहिराणी संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष असल्याने व उद्घाटन सोहळ्याला आमचे नेते येत असल्यामुळे या कार्यक्रमाची व्यवस्था व्यवस्थित झाली की नाही, हे पाहण्यासाठी मी आलो होतो, असा खुलासा आमदार चव्हाण यांनी केला.
आमदार चव्हाणांचे राष्ट्रवादीत स्वागतच
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार नेत्याला या संदर्भात विचारले असता, आमदार चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील, तर त्यांचे पक्षात स्वागतच आहे. नाही तरी, सध्या त्यांच्या पक्षात त्यांना पोषक वातावरण दिसून येत नाही. त्यांच्याच पक्षाच्या खासदारांचे आणि त्यांचे कसे संबंध आहेत हे तालुकाच नव्हे, तर जिल्हा जाणून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद राज्यात वाढत असल्याने त्यांच्यासारखे अनेक जण आमच्या पक्षात येण्यासाठी इच्छूक असल्याने या नेत्याने सांगितले.