जळगाव (प्रतिनिधी) जळगावचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह एकूण चार डॉक्टरांना यावल ग्रामीण रुग्णालयातील साहित्य खरेदीमधील अनियमितता व शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी निलंबित करण्यात आल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. गैरव्यवहाराचे प्रकरण आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील आहे.
या प्रकरणात आणखी तीन जणांचे निलंबन झाले आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी, यावलचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला, जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांचा समावेश आहे. निलंबन कालावधीत डॉ. एन. एस. चव्हाण यांचे मुख्यालय यवतमाळ जिल्हा रुग्णालय राहणार आहे. तर डॉ. बन्सी यांचे मुख्यालय अहमदनगर, डॉ. बारेला यांचे मुख्यालय मालेगाव सामान्य रुग्णालय आणि डॉ. पाटील यांचे मुख्यालय उप जिल्हा रुग्णालय, शिरपूर मुख्यालय राहणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी वैभव कोष्टी यांनी हे आदेश काढले.