जळगाव (प्रतिनिधी) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील भुसावळसह भोलाणे, ता.जळगाव व चितगाव, ता.जामनेर येथील गुन्हेगारांना जळगाव जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्ध (एम.पी.डी.ए.) करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तिघांविरोधात स्थानबद्धतेची कारवाई
जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील राकेश मधुकर कोळी (27, भोलाणे, ता.जळगाव) याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत सहा गुन्हे दाखल आहेत तर पहूर हद्दीतील हुसेन सरदार तडवी (43, रा.चिलगाव, ता.जामनेर) याच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत 16 गुन्हे दाखल आहेत. दोघांविरोधात जळगाव पोलिसांनी 11 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी स्थानबद्धतेबाबत प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी व छाननी झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी राकेश कोळी यास मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर तर हुसेन तडवी यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे स्थानबद्ध करण्यात आले.
भुसावळातील संशयित मुंबईत स्थानबद्ध
भुसावळ बाजारपेठ हद्दीतील सुरज अशोकराव भोगे उर्फ भांगे (24, रा.पापा नगर, राणी मोहल्ला, भुसावळ) याच्याविरोधात गंभीर स्वरूपात सात गुन्हे दाखल आहेत. बाजारपेठ पोलिसांनी 30 जानेवारी 2024 रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी संशयिताला स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. भांगे यास मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे स्थानबद्ध करण्यात आले.
यांनी केली कारवाई
एमपीडीए प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पाचोरा पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस निरीक्षक सचिन सानप, भुसावळ बाजारपेठ पालीस निरीक्षक गजानन पडघण आदींनी सादर केले.