मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आमदारांना व्हीप जारी केला आहे. उद्याच्या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाडांनी तर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे उद्या नेमकं काय होणार?, या चिंतेने आमदारच नव्हे, कार्यकर्तेही टेंशनमध्ये आले आहेत.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या उद्या बैठका आहेत. शरद पवार यांच्या गटाची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक होणार आहे तर अजित पवार यांच्याकडून एमएडीला बैठक बोलावली आहे. उद्या दोन्ही गटाच्या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कायदेशीर कारवाई करण्यासाठी देखील उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. बुधवार, ५ जुलै, २०२३ रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विधान सभा सदस्यांची बैठक आयोजित केली आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळाच्या सर्व विधानसभा सदस्यांनी अवश्य उपस्थित रहावे, असा पक्षादेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाकडून बैठकींना उपस्थित राहण्याबाबत आमदारांना व्हिप जारी केल्यानंतर विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे यांनीही व्हिप जारी केला आहे. तसेच आता अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनी देखील आमदारांना मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याबाबत व्हिप जारी केला आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या 5 जुलै रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, फ्रंटल सेल राज्यप्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे,’ असं ट्वीट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीदेखील मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.
















