जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सर्वात जास्त वर्दळ असलेल्या आकाशवाणी चौकातील सर्कल पार करतांना भले मोठे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ‘चीड येते का खड्ड्यांची’ असे घोषवाक्य तयार केले होते. मात्र, निवडणूक येऊन दहा वर्षे उलटून गेले तरी राजूमामांना खड्ड्यांचा विसर पडलाय का?, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, अग्रवाल चौफुली, बहिणाबाई गार्डन परिसर, बजरंग रेल्वे बोगदा, एसएमआयटी कॉलेज, गणेश कॉलनी आणि पिंप्राळा रोड परिसरात रस्त्यांवर थोडाही पाऊस पडला की पाणी साचते. पाण्यामुळे बजरंग बोगदा बंद पडण्याचा प्रकार तर वर्षानुवर्षापासून सुरूच आहे. दुसरीकडे आकाशवाणी चौकातील मुख्य रस्त्यावरच खड्डा पडला आहे. गेल्या १५ दिवसांत दोन वेळा दुरूस्त करण्यात आला. परंतू पुन्हा खड्डा पडल्याने साचलेल्या पाण्यामुळे हा खड्डा दिसत नसल्याने लहान वाहनांनाचे अपघात होत आहे. दिवसेंदिवस खड्डा मोठा होत असल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे.
या सर्कलवरून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासहबांधकाम विभाग, महापालिकेचे अधिकारी ये जा करत असतात. अगदी जळगाव महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, माजी महापौर, उपमहापौर देखील दिवसात अनेकदा या चौकातून जातच असतात. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह इतर कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्यांना हा खड्डा दिसत नाही का?, लोकप्रतिनिधी साधी तक्रार करून हा जीवघेणा खड्डा बुजण्यासंदर्भात सूचना का करत नाही?, ही सर्व मंडळी सर्व सामान्य जळगावकराचा बळी जाण्याची वाट बघताय का?, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.