मुंबई (वृत्तसंस्था) बच्चू कडूंनी सौदा केला म्हणणे चुकीचे आहे. बाकी इतरांचे मी म्हणत नाही. मात्र, बच्चू कडू माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले, अशी जाहीर कबुली सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे महाविकास सरकारच्या पाडापाडीमागे भाजप असल्याचे पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आले आहे.
“बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहटीला गेले होते. त्यांना मी स्वत: फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे. तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रूपमध्ये यावं. माझ्या एका कॉलवर ते गुवाहटीला गेले. त्यामुळे बच्चू कडूंनी कुणाशी सौदा केला. काही उलटसुलट केलं असा आरोप करणं चुकीचं आहे. बाकी इतरांचं मी काही म्हणत नाही. इतरांनी कुणी सौदा केला असं माझं म्हणणं नाही. पण माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. माझी ही पक्की माहिती आहे की जे लोकं गुवाहटीला गेले ते सर्व एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवूनच गेले होते. कारण त्यांना याची कल्पना होती की उद्या जर आवश्यक संख्या नसली तर आपलं पद देखील जाऊ शकतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादात राज्याच्या प्रमुखांनी लक्ष घालत दोघांना भेटीसाठी बोलावलं होतं. याचीही माहिती फडणवीसांनी आज दिली. दरम्यान, रवी राणा यांनी माफी मागावी, या मागणीवर बच्चू कडू ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली आहे.