मुंबई (वृत्तसंस्था) पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३६ पैशांनी महागले. तर इतर शहरांमध्येही किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. मंगळवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.
देशात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९५ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र कच्च्या तेलाची किंमत पुन्हा कमी होऊ लागली आहे, ज्यामुळे इंधनांच्या किंमतीतही घसरण होण्याची अंदाज वर्तवला जात आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९४.९३ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.७० रुपये मोजावे लागतील. राज्यात नांदेडमध्ये ९६.८७ रुपये आहे. शुक्रवारी येथे पेट्रोल ९८.०७ रुपये झाले होते. तर परभणीमध्ये सर्वाधिक ९७.०६ रुपये आहे. परभणीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.४५ रुपये आहे.
आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८८.४४ रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९४.९३ रुपयांवर पोहोचलं आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८९.७३ रुपये तर चेन्नईमध्ये प्रति लिटर ९०.७० रुपये आहे. त्याचबरोबर, डिझेलचे दर दिल्लीत आज ७८.७४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ८५.७० रुपये आहे, कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर८२.३३ रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर ८३.८६ रुपये आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी गाठला उच्चांकी स्तर
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ६२.४३ डॉलर असून त्यात १.२९ डॉलरची वाढ झाली. तर लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव १.२३ डॉलरने वधारला आणि ५९.४७ डॉलर झाला.