कोल्हापूर (वृत्तसंस्था) काही तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये कालपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. एवढेच नव्हे तर, पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर या संघटनांनी मोर्चा काढत शिवाजी चौकात मोठी गर्दी केली. पण या आंदोलनादरम्यान दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर आता कोल्हापूरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापुरात शिवाजी चौक परिसराला लागून असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला तसेच शिवाजी रोड आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र पोलिसांनी बळाचा आणि संयमाचा उत्कृष्टपणे वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी साडेबारापर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, त्यानंतर दबा धरुन बसलेले तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर आल्याने पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
कुणीतरी मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला, चुकीचा असेल पण त्यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणे हे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्साहित करतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप लावला आहे. तर अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावा लागेल. याच्या पाठीमागे कोण आहे याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत, याकरता या अवलादी पैदा झाल्या नाहीत ना? हे देखील आपल्याला तपासून पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
















