श्रीविराजम्
बिहारचे राजकारण मोठे मजेशीर आहे. यात कधी कोणी छोटा राहिलेला नाही. किंबहुना स्वत:ला छोटा समजतही नाही. राज्याच्या उन्नतीसाठीही ध्येयधोरणे आणि विकासाचा आराखडा काय आहे, हा वेगळा मुद्दा असेल; मात्र त्या-त्या पक्षाचे संघटन आणि जनाधार हा जातीय होता आणि अजूनही कायम राहिलेला आहे. अशा या बिहारमध्ये ‘बडे भैय्या’ म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची आणि तसे नसेल तसे आपण आहोत, हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो. अशा परिस्थितीत जो-तो ‘बडे भैय्या’ बनलेला आहे. हे ‘बडे भैय्या’ कोणाच्या बाजुने हा प्रश्न राजकीय पक्षांमधील एकमेकांनाच नव्हे तर जनतेलाही पडलेला आहे.
तसे तर राजकारणात कोणतीही निवडणूक ही अगोदरच्या कोणत्याच निवडणुकीसारखी कधीच नसते. प्रत्येक निवडणुकीला नव्या वैशिष्ट्यांचे कोंदण असतेच. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीचा निकाल नवा त्यातही अनपेक्षित असाच असतो. बिहार या सूत्राचे नेहमीच अनुसरण करणारे राज्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आताही विधानसभा निवडणुकीच्या रुपाने राज्यात नितीशकुमार, सुशीलकुमार मोदी, उपेंद्र कुशवाह, पप्पू यादव या जुन्या आणि रुळलेल्या नेत्यांबरोबरच २०१४ नंतर उदयास तेजस्वी व तेजप्रताप या यादव बंधूंसोबत आलेले जीतनराम मांझी, चिराग पासवान, मुकेश सहानी या नव्या तरुणांची फळी उभी ठाकली आहे. या सर्व प्रादेशिक नेत्यांच्या गर्दीत राज्यात काँग्रेसला एक म्हणावा असा चेहराच नाही, जनाधार तर बिल्कुल नाही. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत किती गृहित धरावे हा प्रश्न आहे.
देशभरातून ३०० पेक्षा अधिक खासदारांच्या बळावर केंद्रात ‘बडे भैय्या’ असलेला भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये मात्र स्वत:हून ‘छोटे भैय्या’ होण्यास तयार आहे. त्याला कारणेही तशी आहेत. मुळात बिहारमध्ये नितीशकुमारांच्या वर्चस्वाला हात लावणे ही भाजपच्या क्षमतेबाहेरची गोष्ट आहेत. नितीशकुमारांनी आपल्याला सोबत घेऊन रहावे, यासाठी भाजपची अपरिहार्यता लपून राहिलेली नाही. तशी ती तडजोड करायला नितीशकुमारांनाही कमीपणा वाटत नाही. जिथे स्वत:च्या ताकदीने सत्ता मिळविणे शक्य आहे तिथे आटोकाट प्रयत्न करणे आणि जिथे शक्य नाही तिथे सोयीची मैत्री करून सत्तासन पटकावणे, ही भाजपची गुणवैशिष्ट्ये. त्यामुळेच नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) २६ जुलै २०१७ रोजी राष्ट्रीय जनता दलासोबत (राजद) असलेली आघाडी तोडल्यानंतर भाजपने विनाविलंब मैत्रीचा हात पुढे केला आणि नितीशकुमारांना मुख्यमंत्री केले. आताही विधानसभेच्या जागावाटपांमध्ये २४३ पैकी अधिक जागा नितीशकुमारांना विनातक्रार देण्याची तयारी भाजपने केलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून बिहारमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून पाठविलेले देवेंद्र फडणवीस सुद्धा बदल करू शकणार नाही, इतका नितीशकुमारांचा बिहार भाजपवर देखील दबाव आहे. याचे कारण जातीय समीकरणात दडलेले आहे. बिहारमधील उच्चवर्णीय जातींमध्ये भाजपचा जनाधार असल्याचे मानले जात असले तरी सत्ता मिळविण्यासाठी तितके पुरेसे ठरत नाही. ती कमी नितीशकुमारांच्या रुपाने भरून निघते. इतर मागासवर्ग आणि छोटा जातींमध्ये असलेल्या नितीशकुमारांच्या जनाधाराचा भाजपला फायदा होतो. आताही तो हवाय म्हणून जागावाटपात फार आढेवेढे घेण्याच्या मूडमध्ये भाजप सध्या तरी नाही. आणि तसे करण्याची संधी नितीशकुमार यांच्याकडून देखील मिळणार नाही.
बिहारमधील प्रबळ पक्ष म्हणून लालूप्रसाद यादव यांच्या ‘राजद’चा उल्लेख केला जातो. कधी काळी काँग्रेसविरोधात उभ्या राहिलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात लालूप्रसाद यादव यांनी युवा कार्यकर्त्याची भूमिका बजावली होती. त्या आंदोलनात त्यांच्यासोबत नितीशकुमार देखील होते. नंतरच्या काळात विशेषत: मुस्लीम आणि यादव मतांची गोळाबेरीज करीत लालूंनी बिहारमध्ये सत्ता मिळविली आणि थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १५ वर्षे आपली हुकूमत कायम राखली होती. त्यांच्या या जातीय समीकरणाला रामविलास पासवान यांच्या रुपाने दलित नेतृत्त्वाची साथ मिळाली. आताही ‘राजद’चा या परंपरागत जातीय मतांवरील प्रभाव कमी झालेला नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यात तीन दशकांपासून एकमेकाविरोधात लढणाऱ्या लालू आणि नितीशकुमारांनी एकत्र येत २०१५ ची विधानसभा निवडणूक लढविली आणि भाजपला सत्तेपासून दूर फेकले. या निवडणुकीत ‘जेडीयू’पेक्षा ‘राजद’ने अधिक जागा जिंकत आपण राज्यात ‘बडे भैय्या’ असल्याचे जनाधारातून सिद्ध केले. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून नितीशकुमार यांचा दावा नाकारला देखील नाही. या दोन्ही पक्षांच्या महागठबंधनने स्थापन झालेले सरकार जेमतेम दोन वर्षे टिकले. पशुखाद्य गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध झाल्याने लालूप्रसाद यादव आता कारागृहात असल्याने ‘राजद’ची धुरा त्यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यांच्याकडे आहे. लालूप्रसादांच्या उपस्थितीत जे निर्णय घेणे यापूर्वी शक्य नव्हते, ते आता घेण्याची तेजस्वी यांना जणू मुभा मिळालेली आहे. त्यामुळे ते वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे तडजोडी करण्याच्या कोणत्याही विचारात नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महागठबंधनमध्ये ‘राजद’सोबत जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान अवाम मोर्चा (हम), उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष (आरएलएसपी) तसेच मुकेश सहानी यांच्या विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) या छोट्या पक्षांचाही समावेश होता. लोकसभेच्या राज्यातील ४० पैकी निम्म्या जागा ‘राजद’ला मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला नऊ आणि ‘आरएलएसपी’ला पाच जागा दिल्या होत्या. या व्यतिरिक्त ‘हम’ आणि ‘व्हीआयपी’ला प्रत्येकी तीन तर डाव्या पक्षाला एक जागा सोडली होती. या पक्षांना दिलेल्या जागांच्या बदल्यात मिळालेलली मतांची टक्केवारी बघता ‘राजद’ची पुरती निराशा झाली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत इतकी मोठी तडजोड करण्याची तेजस्वी यांची बिल्कूल तयारी नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘हम’ आणि ‘आरएलएसपी’ या पक्षांना महागठबंधनमधून बाहेर पडण्यास तेजस्वी यांनी भाग पाडत आता आपणच ‘बडे भैय्या’ असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांशी त्यांनी आघाडी करण्याची तयारी नसल्याचे सूतोवाच दिले आहे. काँग्रेसला पण जागावाटपाची बोलणी तेजस्वी यांच्याच कलाने करावी लागणार आहे.
बिहारमधील इतर मागासवर्गात मूठभर जनाधार असलेल्या उपेंद्र कुशवाह यांचा आव हा कायम मीच ‘बडे भैय्या’ असा राहिलेला आहे. नितीशकुमारांचे बोट धरून राज्यसभेत पोचलेल्या कुशवाह यांनी नंतर मात्र स्वत:ची वेगळी चूल मांडली. महाराष्ट्रातील ताकदवान नेते छगन भुजबळ यांच्याशी जवळीक असणाऱ्या कुशवाह यांच्या पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी नितीशकुमारांच्या जेडीयू’च्या वाट्याला केवळ दोनच जागा गेल्या होत्या. त्यामुळे आमचा पक्ष ‘जेडीयू’पेक्षा मोठा असल्याचे जाहीर वक्तव्य कुशवाह करीत होते. परंतु, आपल्या चंचल वृत्तीनुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपप्रणित राष्ट्रीय विकास आघाडीमधून बाहेर पडले. आताही ‘राजद’चे नेतृत्त्व म्हणजेच तेजस्वी हे नितीशकुमार यांच्यापुढे टिकणार नाही, असा मुद्दा पुढे करून ते महागठबंधनमधून बाहेर पडले आहे. त्यामुळे सध्या तरी कुठलेच नसलेले हे स्वयंघोषित ‘बडे भैय्या’ काय भूमिका घेतात, हे स्पष्ट झालेले नाही.
२०१४ नंतर नितीशुकमारांनी दिलेल्या राजीनामा नाट्यामुळे ‘जेडीयू’कडून मुख्यमंत्री होण्याचा जीतनराम यांना अचानक संधी मिळाली. नंतर नितीशकुमारांशी वाद झाल्याने ते ‘जेडीयू’मधून बाहेर पडत ‘हम’ या पक्षाच्या रुपाने जनतेपुढे गेले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना साथ दिली नसली तरी राज्यातील दलित नेते म्हणून त्यांचा उदय नक्कीच झाला. याच नवप्रतिमेचा वापर करण्याची खेळी नितीशकुमारांशी आखली आणि तेजस्वी यांच्याकडून दुखावलेल्या जीतनराम यांना मागील वाद विसरून जवळ करण्याचा सोयीस्कर मोठेपणा नितीशकुमारांनी दाखविला. याचा परिणाम ‘एनडीए’चा अगोदरच घटकपक्ष असलेल्या ‘लोजप’वर झाला आहे. नितीशकुमार नसल्याने लालूप्रसादांशी असलेली मैत्री सोडून ‘एनडीए’मध्ये जाणाऱ्या पासवान पिता-पुत्राला आता नितीशकुमारांसोबतच जीतनराम यांच्याशीही संघर्ष करावा लागत आहे.
बॉलिवूडमधील स्टेज डिझायनर म्हणून भरपूस नाव कमावलेले आणि मल्लाह अर्थात निषाद जातीचे नेतृत्व करणारे मुकेश सहानी हे तरुणांची गर्दी खेचत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला यश मिळाले नसले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांची जादू दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील लोकसंख्येत १५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदार असल्याचा त्यांचा दावा आहे. मुंबईत रोजगाराच्या संधी देण्यात त्यांनी दिलेले योगदान बिहारी तरुणांना आकर्षित करीत आहे. तुलनेने कोरी पाटी असल्याने आणि जागावाटपात अजून तरी हावरेपणा दाखवित नसल्याने जीतनराम किंवा कुशवाह यांच्यापेक्षा सहानी यायना सोबत घेण्याबाबत तेजस्वी अजून तरी अनुकूल आहेत. बिहारमधील उत्तर-पश्चिम भागात थोडेबहुत वर्चस्व असलेले बाहुबली नेते म्हणून पप्पू यादव ओळखले जातात. कधीकाळी लालूप्रसादांचा चेला अशी ओळख असलेले पप्पू हे जन अधिकार पक्षाच्या रुपाने निवडणूक रिंगणात उतरले आहे. राज्यात कोणाशी युती करण्याची गरज नाही, असे सांगत आपणच ‘बडे भैय्या’ असल्याचा त्यांचा थाट आहे. सतत खळबळजनक आणि जोरदार भाषणबाजी करीत राजकीय वातावरण तापवित ठेवण्याची त्यांची खासीयत आहे.
राजकारणात आपली ताकद कमी नाही, हे दाखविणे अपरिहार्य असते. मात्र, त्यासाठी आपली संघटनात्मक बांधणीही असावी लागते. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी बांधणी असलेले प्रस्थापित पक्ष आपण ‘बडे भैय्या’ असल्याचे दाखविणे स्वाभाविकच आहे. मात्र, ज्यांना कुठलाही जनाधार नाही, असे नेतेही थोपटत असल्याने त्यांची अवस्था ‘वाटलं तर दोन मारा; पण आम्हाला बडे भैय्या म्हणा’ अशी झाल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतांचा कौलच कोण ‘बडे भैय्या’ आहे, हे ठरवेल.
श्रीविराजम्
Shreeviraj1@gmail.com