जळगाव (प्रतिनिधी) दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून निखील चौधरी (वय १६) हा युवक जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास शिवाजी नगरातील क्रांती चौकात घडली. या घटनेनंतर संप्त झालेल्या नागरिकांनी घोषणाबाजी करीत रास्तारोको केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पीड ब्रेकर टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात समोरासमोरुन जात असलेल्या दोन दुचाकींची धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील निखील चौधरी हा युवक जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या
कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु आंदोलकांनी स्पीड ब्रेकर बसविण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांना घटनास्थळी यावे अशी मागणी लावून धरली. काही वेळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.