मुंबई प्रतिनिधी । मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार रात्रीपासून मुंबई पावसाची बॅटिंग सुरूच आहे. तसेच आणखी आठवडाभर पावसाचा जोर असाच कायम असणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबई उपनगरासह, दादर, हिंदमाता, अंधेरी, अंबोली या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. तसेच मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचा संकट कायम असून, दुसरीकडे मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतर्फे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे, तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.