जळगाव ( प्रतिनिधी ) : भरधाव वाहनाच्या धडकेत अपराजीता राधेशाम सिसोदीया (वय ३०, रा. योगेश्वर नगर, गजानन पार्क) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास नशिराबाद सर्विस रोडवरील डीसीबी बँकेजवळ घडली. याप्रकरणी मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील योगेश्वर नगरात राहणारे अपराजीता सिसोदीया हे दि. २६ रोजी दुपारी (एमएच ०४, डीबी ४११९) क्रमांकाच्या दुचाकीने नशिराबादकडून सर्विस रोडने जळगावकडे जात होते. यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०४, ईएल, ८३०२) क्रमांकाच्या मालवाहून वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सिसोदीया यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. धडक दिल्यानंतर वाहन चालक मदत न करता तेथून पसार झाला. उपचार घेतल्यानंतर सिसोदीया यांनी दि. २८ रोजी नशिराबाद पोलिसात तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















