जळगाव (प्रतिनिधी) शेतासह शेतीसाहित्याची रखवाली करण्यासाठी आलेल्या बिलवाडीतील रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (वय ५२ )यांचा खून करत अज्ञात मारेकऱ्यांनी ट्रॅक्टर लांबवले होते. जळगाव एलसीबीच्या पथकाने मध्य प्रदेशातून दोघांना अटक केली. पण अटक पाहिजे तेवढी सोपी नव्हती. यावेळी संपूर्ण गाव गोळा झाल्यामुळे अटकेचा चांगलाच सिनेस्टाइल थरार रंगला. विशेष म्हणजे जळगाव एसपी एम.राजकुमार यांनी बडवाणी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर संशयितांची अटक सुकर झाली. पवन बहाधीर बारेला (वय ३०, वाघाड ता.राजापूर जि. बडवाणी) व बाधरसिंग शोभाराम बारेला (वय २४, रा.सानीकल (सालीतांडा) ता.राजापुर जि. बडवाणी म.प्र), असे अटकेतील संशयित साला-मेव्हण्याचे नाव आहे.
नेमकं काय घडलं ?
बिलवाडीतील रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (वय ५२ )यांचा खून झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. रखवालदार पांडुरंग पाटील हे बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांच्या वावडदा ते म्हसावद दरम्यान असणार्या शेतामध्ये रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले असता मध्यरात्री दरोडेखोरांनी शेतात प्रवेश करीत रोटोव्हेटर व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रखवालदार पांडुरंग पाटील यांनी विरोध केला व दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्यांचा खून केला होता.
एक फोन केला आणि पोलिसांना पुरावा गवसला !
जळगाव एलसीबीच्या पथकाने चौकशीला सुरुवात केली असता ईश्वर पाटील यांनी सांगितले की, त्यांच्याकडे मयत पांडुरंग पाटील यांच्यासह पवन बारेला हा देखील रखवालदारीच्या कामाला होता. परंतू तो कुटुंबासह दिवाळीनिमित्त आपल्या गावी चार -पाच दिवसापूर्वीच गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातील तीन सराईत ट्रॅक्टर चोरांवर लक्ष केंद्रित केले. परंतू तिघंही चोरटे घटनेच्या दिवशी जिल्ह्यात नसल्याचे समोर आले. दुसरीकडे एलसीबीच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासायला केली. त्यांना रात्री एका ट्रॅक्टर मागे दुचाकी जात असल्याचे फुटेज मिळाले. हे ट्रॅक्टर एरंडोलच्या दिशेने गेले होते. तशात दुसऱ्या पथकाने घटनेच्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम पुन्हा समजून घेतला. यावेळी ईश्वर पाटील यांनी सांगितले की, त्यांच्याकडे कामाला असलेल्या पवनचा त्यांना फोन आला होता. परंतू हॅलो बोलून त्याने फोन कट केल्याचे सांगितले. पोलिसांनी पवनचा नंबरचे लागलीच डिटेल काढले असता धक्कादायक माहिती समोर आली. सुटीवर गेलेला पवनच्या फोनचे लोकेशन बिलवाडी परिसरातच आढळून आले. त्यामुळे पो.नि. किसन नजन-पाटील यांनी तात्काळ एक पथक मध्य प्रदेशाच्या दिशेने रवाना केले.
संशयितांना नेण्यास गावाच्या मुखियासह सर्वांचा विरोध !
जळगाव एलसीबीचे पथक मध्य प्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील राजापुर तालुक्यातील सानीकल (सालीतांडा) येथे पोहचले. अवघ्या आठ-दहा घरं आणि चारही बाजूला जंगल असल्यामुळे पोलिसांसमोर मोठ्या अडचणी होत्या. गावातून संशयितांना ताब्यात घ्यायचं म्हटलं तर विरोधात लक्षात घेता जंगलातून बाहेर पडणे मुश्कील होणार होते. परंतू पोलिसांनी अखेर स्थानिक पोलिसांची मदत घेत सिनेस्टाईल युक्ती लढवत मोटार सायकल चोरीचा गुन्हा असल्याची बतावणी करत संशयितांना स्थानिक पोलीस स्थानकात येण्याचे सांगितले. यावर संशयित पवन तयार झाला. परंतू मागोमाग गावकरी देखील पोलीसा स्थानकात धडकले. यामुळे आता आरोपीला सोबत कसं न्यायचं असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अगदी स्थानिक पोलिसांनी देखील हतबलता दाखवत होते.
जळगाव एसपींनी साधला बडवाणी पोलीस अधीक्षकांशी संपर्क !
एलसीबीच्या पथकाने पो.नि. किसन नजन-पाटील यांच्यासोबत संपर्क साधत सर्व हकीगत सांगितली. पो.नि. नजन पाटील यांनी याबाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना देखील सर्व हकीगत सांगितली. अगदी मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्य न केल्यास आरोपींना ताब्यात घेत जळगावला आणणे शक्य नसल्याचे सांगितले. मग काय…एसपी एम. राजकुमार यांनी तात्काळ बडवाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगितले. बडवाणी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना सक्त सूचना केल्यानंतर अखेर पवन बारेला व बाधरसिंग बारेला या दोघं साला-मेव्हण्याला ताब्यात घेत जळगावात आणले.
…म्हणून रचला ट्रॅक्टर चोरीचा प्लान !
पवन बारेला आणि बाधरसिंग बारेला हे साला-मेव्हना बिलवाडी परिसरातच कामाला होते. गावी घरी गेल्यावर त्यांना कळाले की, त्यांच्या परिसरातील एका व्यक्तीला ट्रॅक्टरची गरज आहे. मालकाच्या शेतात एक ट्रॅक्टर असल्याचे यांना माहित होते. त्यामुळे दिवाळीसाठी आपण घरी आलो आहोत, त्यामुळे आपण ट्रॅक्टर चोरले तरी कुणालाही संशय येणार नाही, याची दोघांना खात्री होती. त्यामुळे दोघांनी मंगळवारी रात्री पुन्हा जळगाव गाठले. रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास दोघं जण बिलवाडी परिसरात पोहचले. पांडुरंग पाटील हे झोपले असतील असं समजून त्यांनी ट्रॅक्टर सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतू बाजूला झोपलेले पांडुरंग पाटील यांना जाग आली.
चोरी करतांना बघण्याचाच नव्हे तर वाद घातल्याचाही राग होता मनात !
पवन बारेला यांच्यासोबत पांडुरंग पाटील याच्यासोबत किरकोळ विषयावरून वाद झाला होता. तशात ट्रॅक्टर चोरी करतांना आपल्याला बघितल्यामुळे ते आपला भांडाफोड करतील याची दोघांना खात्री होती. आधीचा वाद तशात चोरी करतांना बघितले, त्यामुळे लोखंडी रॉड त्यांनी पांडुरंग पाटील यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात ते जागीच ठार झालेत.
ट्रॅक्टर चालवता न आल्यामुळे सोडले रस्त्यात !
पांडुरंग पाटील यांचा खून केल्यानंतर ट्रॅक्टर घेऊन पवन आणि बाधरसिंग हे निघाले. ट्रॅक्टरच्या मागे दुचाकी चालत होती. कारण पवनने दिवाळीत फिरायला म्हणून मालकाची दुचाकी सोबत नेली होती. परंतू ट्रॅक्टर चालवता न आल्यामुळे दोघांनी एरंडोलजवळ ट्रॅक्टर सोडून थेट आपल्या गावाकडे पळ काढला होता. परंतू मोठ्या शिताफीने एलसीबीच्या पथकाने दोघांना अटक करून जळगावात आणलेच !