बुलडाणा (वृत्तसंस्था) बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, अलीकडेच तरुणाच्या पत्नीने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत असताना त्याचे एक बिंग फुटले. याच तणावातून संबंधित तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले.
यासंदर्भात अधिक असे की, मंगेश हरिभाऊ पेरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मंगेश पेरे बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होता. तिथे तो दिनेश प्रल्हाद पेरे या नावाने वावरत होता, दिनेश हा मंगेशचा मावसभाऊ दिनेशचे २०१४ मध्येच निधन झाले होते. त्याच्या नावाच्या कागदपत्रांचा उपयोग करून मंगेशने दिनेशच्या नावाने नोकरी मिळवली होती. डिसेंबर २०२० पर्यंत तो नियमित नोकरीवर होता. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगेशविरुद्ध त्याच्या पत्नीने छळाची तक्रार दिली होती. त्या तपासासाठी पोलीस बीएमसी कार्यालयात गेले तेव्हा तिथे काम करणारा दिनेश हा मंगेश असल्याचा खुलासा झाला होता. त्यानंतर त्याचे निलंबनसुद्धा झाले होते. नोकरी गमावल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याने देऊळगाव घुवे येथे मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुरू केले होते. त्याची पत्नीही त्याच्यासोबत न राहता माहेरी राहत होती. गुन्हा दाखल झाल्याच्या तणावातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.