मुंबई (वृत्तसंस्था) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा आशयाचे फलक भाजप नेत्यांच्या हातात होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
गुरुवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे या अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहणार नाहीत, सभागृहनेते म्हणून मुख्यमंत्री मोजके दिवस अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. त्याचवेळी ईडीच्या कारवाया, मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी, ओबीसी आणि मराठा आरक्षण, १२ आमदारांचे निलंबन मागे घेणे असे गोंधळाचे अनेक विषय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार आहेत. विरोधक अत्यंत आक्रमक असणार असल्याची चर्चा सुरू आहे.
३ ते २५ मार्च असेल अधिवेशनाचा कालावधी
३ ते २५ मार्च असे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होत आहे. ३ मार्च रोजी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. दरम्यान, या काळातच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. २५ मार्च रोजी अधिवेशनाचा समारोप होईल.
कोणत्या मुद्द्यांवर भाजप घेरणार
१. मलिकांचा राजीनामा २. कृषिपंपांची वीज तोडणी ३. छत्रपतींच्या वारसांचे उपोषण ४. मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ५. महाज्योतीला न दिलेला निधी ६. महात्मा फुले कृषी कर्जमाफीचा फज्जा ७. आदिवासी पेसा योजनेतील कपात ८. सामाजिक न्यायचे अन्यायकारी रोस्टर ९. परीक्षांचे घोटाळे १०. चरमसीमेला पोहोचलेला भ्रष्टाचार
१२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर दुसरी एक शस्त्रक्रिया पार पडली. तेव्हापासून मुख्यमंत्री सरकारी कामकाज दूरदृश्य प्रणालीद्वारे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला बहुतांश दिवस उपस्थित असणार नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात सत्ताधारी बचावात्मक पवित्र्यात राहण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.
















