अमरावती (वृत्तसंस्था) त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भाजप बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.
अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं. मात्र, असं असतानाही समोर आलेल्या दृष्यांनुसार आंदोलक बंद दुकानांची कुलुपं तोडून तोडफोड करत असल्याचंही दिसत आहे. तसेच दुकानांबाहेरील साहित्याचंही नुकसान केलं जातंय. त्यामुळे आक्रमक आंदोलकांसमोर पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याचं चित्र आहे. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचारा विरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केली.