मुंबई (वृत्तसंस्था) राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होण्याचं टळलं आहे. कारण भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळं राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघारी घ्यावी, असं आवाहन केलं होतं. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे केली.
काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करुन चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याननंतर काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचं चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केलं.