नागपूर (वृतसंस्था) राज्यातील ही पहिलीच निवडणूक असून या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. पदवीधरच्या तीन पैकी दोन जागा सध्या भाजपकडे असून भाजपपुढे या जागा राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांवरून रस्सीखेच चालली असताना राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची वर्णी विधान परिषदेवर लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही नियुक्ती वारंवार लांबणीवर पडत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन नावे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राज्यपाल निकषांवर बोट ठेवून ही नावे फेटाळण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार अत्यंत सावधपणे पावले टाकत आहे. एकीकडे हा तीढा कायम असतानाच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याने राजकारण चांगलंच तापण्याची चिन्हे समोर येत आहेत. राज्यावर करोना साथीचं संकट ओढवल्यानंतर सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्याचवेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या पाच जागा एकत्रितपणे लढणार का?, एकत्रित लढणार असतील तर जागांचे वाटप कसे होणार?, हे पाहणे मह्त्त्वाचे ठरणार आहे.
ऐन दिवाळीच्या उत्सवात निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. १२ नोव्हेंबर रोजी नामांकनासाठी अखेरचा दिवस तर, १३ तारखेला छाननी होऊन १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. १ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल.















