मुंबई (वृत्तसंस्था) बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर ४० ते ५० मृतदेह वाहत आल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपानं रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजप सरकारनं रामभरोसे सोडलं आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे.
मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. तर कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. अशातचं सरकार मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दुसरीकडे वैद्यकीय सुविधांचा प्रचंड अभाव यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होतं. अशातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काही प्रेतं नदीत वाहून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
“उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेते दिसली आहेत. याठिकाणी परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये टेस्टींग होत नाहीय. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. प्रेते जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक प्रेते नदीत टाकत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.
एवढंच कशाला प्रेतं जाळण्यासाठी याठिकाणी लाकडंही नाहीत. म्हणूनच नातेवाईक कोरोना रुग्णांची प्रेतं अशाप्रकारे नदीत टाकून देत आहेत. ही सत्य परिस्थिती आहे असंही नवाब मलिक यावेळी म्हणाले. एकीकडे उत्तर प्रदेशात कोरोना स्थिती भयावह बनत चालली आहे. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिरातबाजी करून सत्यापासून दूर पळत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.