मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शिवसेनेला खिंडार पडल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य भवनाला पत्र लिहून राज्य सरकारने मागील दोन दिवसांत घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. मागील 48 तासांत राज्य सरकारने 160 च्यावर आदेश काढल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
राज्यपालांना उद्देशून लिहलेल्या पत्रात दरेकरांनी लिहलं आहे की, कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची. गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत:राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.
अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश काढून निर्णयांचा सपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. १६० च्या वर शासन आदेश ४८ तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे.