नवी मुंबई (वृत्तसंस्था) माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन बुधवारी माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री आणि सध्याचे भाजप आमदार गणेश नाईक यांचा नातू संकल्प संजीव नाईक आणि त्याचा मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषीकेंद्र शोधण्यासाठी जात होते. त्यावेळी माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना तळवली गावाजवळून त्यांनी आपली गाडी पुन्हा मागे फिरवली. यावेळी गाडीच्या मागून येणारा एक दुचाकीस्वार गाडीला धडकला. त्यामुळे तो खाली पडला. त्याचवेळी संकल्प नाईक आणि त्याचा मित्र गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या दुचाकीस्वाराला उचलले. त्याला त्याचे नाव विचारले असता, त्याने प्रविण रघुनाथ लिहे असे सांगितले. त्याचवेळी जखमी झालेल्या प्रविण यांचा मुलगा निलेश जवळच असलेल्या हनुमान हॉटेल येथे होता. त्याच्यासोबत त्याचे इतर तीन साथीदारही होते. त्या चौघांनी मिळून संकल्प नाईक आणि त्याच्या मित्राला मारहाण केली.
याप्रकरणी निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे. या घटनेत तेजेंद्रसिंग मंत्री यांच्या गळ्यातील सव्वातोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली आहे. सध्या याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.