मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांमागे ईडी लागल्याने विरोधकांकडून टीका केली होती. .
मुंबई मनपात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) नोटीस बजावली आहे. मात्र लाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण २००९ मधील असताना पोलिसांनी आता नोटीस पाठवण्याची गरज काय? इतके दिवस पोलिस झोपले होते काय, असा सवाल करतानाच केवळ सूडबुद्धीतूनच मला नोटीस बजावण्यात आली आहे, असा दावा लाड यांनी केला आहे. लाड म्हणाले, २००९ मध्ये ही तक्रार दाखल झाली. बीव्हीजी व क्रिस्टलने हे काम केले होते. काम समाधानकारक होते म्हणून पालिकेने आमचे डिपॉझिटही परत केले आहे. याचाच अर्थ यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. दाखल तक्रारीत माझे कुठेही नाव नाही. हे सरकार फक्त आमच्याविरोधात कारवाया करत आहे. हा खोटा गुन्हा असून तो रद्द करण्यासाठी मी कोर्टात जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून माझे मालाड वेस्टला कोणतेही घर नाही. ही नोटीस सूडबुद्धीने पाठविण्यात आली आहे, असा खुलासा प्रसाद लाड यांनी केला.
विरोधकांचे नेते, आमदारांमागे ईडीची चौकशी लावल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारही हाच कित्ता आता गिरवत आहे. त्याचा पहिला मोहरा भाजप आमदार प्रसाद लाड ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.